Friday, September 7, 2007

मारुती

रात्री दीड दोन वाजता दारावर थाप पडली. आम्ही दचकून उठलो.
बाहेरून कुणीतरी "दिलीप भाय !! ओ दिलीप भाय अशी हाक मारत होत. बाबा उठले..."कोण आहे??" ओरडले.आवाज तसा ओळखीचा होता.
दरवाजा उघडला. रेलवे स्टाँल वरचा शिरीभैय्या कोणाला तरी घेऊन आला होता. 2-3 माणसे होती. डोक्यावर मुस्लिम टोप्या होत्या. पांढरा शुभ्र झब्बा-लेंगा घातला होता.

"क्या हुआ?" बाबा.
"ये कुछ लोग आए थे.. आपका पता पुछ रहे थे? बहोत अर्जेंट काम है बोल रहे है! आपको ही बतायेंगे !"
एकदम एक जण पुढे झाला....नमस्कार करून बोलला.. "आठ दिन से औरत को ढूंढ़ रहा हू.. मुबई से अजमेर जा रहे
थे!! रात का सफर था.. सुरत पहुँचे तो देखा की वो जगह पर नही है... गाडी में देखा... नही मिली..
आठ दिनोमें सुरत से मुंबई तक हर स्टेशन पर एंक्वाइरी कि, कोई पता नही. आज दहानू पोलीस स्टेशन से फोन आया था. एक औरत की लाश मिली थीं चार दिन पहले.. दहानू स्टेशन के पास....उन्होने फोटो दिखाया.."

एवढं बोलला आणि एकदम रडायला लागला. बाजूचे दोघे ही धाय मोकलुन रडायला लागले. आम्हाला काही सुचेचना..
बाबांनी त्याला धीर दिला.
"फिर?? पोलीस क्या बोल रहे है?"
"लाश समुन्दर किनारे दफ़ना दि है बोले..."
पुर्वी डहाणू सारख्या ठिकाणी प्रेत ठेवण्यासाठी काही सोय नसल्यामुळे... बेवारस प्रेतांना 3-4 दिवसांनतर समुद्रकिनारी दफन करायचे.
तिघे जण खुप रडत होते....आईने चहा केला.... बाबांनी ओळखले की काय कामासाठी आलेत हे लोक...
वर्षातून एकदातरी असं कोणीतरी यायचं.. मला काहीच कळायच नाही की हे लोक कोण येतात आणि अचानक बाबा वैगरे मारुती ला शोधायला पाड्यावर का जातात... पाडा म्हणजे 15-20 घरांची आदिवासींची वस्ती.
आणि आता या गोष्टीचा नायक....मारुति...

लहानपणापासून हा माणूस आमच्याकडे का येतो.. आजोबा याला का पैसे देतात आणि हा दिवसभर आमच्या घराची काहीतरी साफसफाई करत का राहतो हे आम्हाला कधीच कळलं नाही... अजुनही माहित नाहि.
परत हा चोवीस तास दारूच्या नशेत....आम्ही त्याच रूप पाहून थोडसं घाबरायचोच त्याला..
दाढी वैगरे वाढलेली असायची... बर्‍याच वेळा अंगावर कपडे नसायचे.. आजोबांचाच फाटका पंचा हा नेसायचा.. वयाने आजोबांहून दुप्पट म्हातारा दिसायचा.. भूतांच्या गोष्टीतला म्हातारा असतो ना अगदी तसाच.
दिवसभर काहीतरी बडबड सुरू असायची.... दुपारी जेवायचा मग घरच्या मांडवातच झोपायचा.
आम्ही जवळ आलो कि वारली भाषेत काहीतरी शिव्या द्यायचा... पण आम्ही कधी फार जवळ जायचा प्रयत्नच नाही केला...
संध्याकाळी पाड्यावर निघून जायचा... बहुतेक एकटाच राहायचा....पण काहीतरी खास होतं त्याच्यात एवढं नक्की..

आज ही बाबा आलेल्या त्या सगळ्यांना घेऊन काकाच्या घरी जायला निघाले.. घरात तेव्हा जीप होती. काकाचे घर जवळच होते. आलेले लोक मुंबई चे होते. त्यांच्याकडे त्यांची गाडी होती. पण त्यादिवशी बाबाना काय झालं काय माहीत त्यानी मला पण बरोबर घेतल...
आम्ही काका बरोबर पाड्यावर गेलो...मारुती च्या घरी....
म्हणायला फक्त घर होतं...8 बाय 8 च्या कुडाच्या भिंती होत्या फक्त.... म्हातारा घराबाहेरच झोपला होता... बाबांनी एका हाकेत उठवलं....
चेहरयावर कुठलेही भाव नव्हते...."मारुती चल निघायाचयं.... " बाबा.
हा शांतपणे उठला... गाडीत येऊन मागे बसला.... दारूचा वास पुर्ण गाडीत पसरला .... मी नाक बंद केलं
"दादा नवासूया भेटाया लागल..." मारुती.
काका ने जोरात शिवी घातली. " ******* संध्याकाळी झाली तेवढी पुरी नाही का??"
"तुला मायतेय ना दादा.. पोटात गेल्या बिगीर् नाही वास लागत्..."
आम्ही नवसू च्या घराकडे जीप वळवली. नवसू म्हणजे चिकू च्या दारूचा धंदा करणारा पाड्यावरचा पोरगा......
त्याला उठवला...2 बाटल्या बरोबर घेतल्या.... काकाने शिवी देऊन एक म्हातरयाच्या हाती दिली... त्याने क्षणाचाही विलंब न करता तोंड लावलं....मागच्या गाडितले लोक बिचारे ह्ताशपणे सगळं पाहत होते...

मारुती बरोबर पाड्यावरची आणखीन 2 माणसं पण आम्ही जीप मध्ये घेतली..दोन्ही गाड्या सुरू झाल्या... आणि थेट समुद्रकिनारयावर पोचल्यावारच थांबल्या...हा झिंगत झिंगत गाडीतून उतरला....
"वस्तू आणलयं व्हय....??" याने काकाला विचारले
"भाभी का कुछ चीज लाये हो साथ में??" काकाने त्यातल्या वयाने सगळ्यात मोठ्या दिसणार्‍या माणसाकडे बघून विचारले.
याचे नाव अश्रफ भाई होते...आणि बाकीचे दोघे म्हणजे त्याची मुलं होती...
त्याने गाडीतुन एक साडी काढून काकाकडे दिली.... त्याने मारुतीच्या हातावर ठेवली...म्हातारयाने बाटली एका घोटात अर्धी केली...साडीचा नाकाजवळ नेउन जोरात वास घेतला..... आणि झिंगत झिंगत सुरुच्या

बागेतुन किनारयाजवळ जायला सुरूवात केली... आम्ही सगळेही मागोमाग पाळायला लागलो....
हा मध्येच पळायचा...मध्येच थोडावेळ थांबायचा...कधीतरी स्वातःभोवतीच एक चक्कर मारायचा....
एका ठिकाणी मात्र खूप वेळ थांबला.. बाबांकडे मान फिरवली आणि ओरडला "यथंच आहे दादा !"
काका आणि बाकिचे दोघे पुढे झाले ... बाबा मला, अश्रफ भाई आणि त्याच्या मूलांना घेऊन मागे राहिले .... ते तिघे पुढे जात होते ...पण बाबांनी थांबा म्हटलं...
कुदळ आणि फवडा बरोबर होताच..... मारुती मात्र तेथेच आडवा झाला. ... त्याच्यात आता बोलण्याचीही ताकत उरली नव्हती...प्रचंड थकवा आला होता.
बाकी दोघे त्याने दाखवलेल्या ठिकाणी जमीन खोदायला लागले...... थोड्याच वेळात एकदम दुर्गंधी आली... मी पट्कन नाकाला हात लावला. बाबांनी माझ्याकडे डोळे मोठं करून पाहिलं... नाकाचा हात

काढला.....
दोघं आदिवासी आणि काका खड्ड्यात उतरले. तिघांनी मिळून एकदम प्रेत उकरुन काढल. अश्रफ भाई आणि त्यांची मुलं जागीच कोसळली. त्यापैकी एकाचा तर शब्दच फुटेना तोंडातून... बाबांनी सावरलं त्यांना. त्यांनी आणलेली साडी प्रेताच्या अंगावर टाकली.

थोडावेळ सगळेच शांत बसून राहीले... फक्त लाटांचा आवाज येत होता.

"30 साल हुए हमारे शादी को परसो.. उसके लिये अजमेर जा रहे थे" असं म्हणून अश्रफ भाई राडायला लागले...एक मुलगा सावरला होता. त्याने त्यांना घट्ट मिठी मारली...

ते दृश्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही.
"अँब्युलेन्स मिलेगी मुबई जानेको?" त्यांच्या मुलाने विचारलं.
"आता बाँडी घेऊन जाणं शक्य नाही कुठे.... रात्रीच इथे अंतिम संस्कार करावे लागतील! " बाबा म्हणाले.
तिघांना समजावून सांगितलं.
काकाने पोलीस इनस्पेक्टर ला फोन लावला. त्यांना प्रेत मिळाल्याची आणि आम्ही सकाळच्या आत विधी उरकणार आहोत अशी कल्पना दिली.
मला घेऊन बाबा घरी आले. काकाही पहाटे या तिघांबरोबर घरी आला. मारुती अजूनही जीप मध्ये झोपुन
होता... बाकी दोघांनी त्याला उतरवलं...
आईने सगळ्यांना चहा दिला.... मी जागा नाव्हतो... पहिल्यांदाच रात्री जागरण झालं होतं.....
ते तिघे काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. अश्रफ भाई नी खिशात हात घातला. 100 च्या नोटांच एक बण्डल काढलं बाहेर....
बाबा हसले ... मानेनचं नाही म्हणाले...
"उसके लिये तो रख लेना..." मारुति कड़े बोट दाखावुन अश्रफभाई म्हणाले.
"उसको पैसेसे कुछ लेना देना नही है... उसका खुदाही मालिक है..." काका म्हणाला..
अश्रफ भाई पुढे झाले... त्या 2 आदिवासींच्या हातावर 500 रुपयांच्या 2 नोटा टेकवल्या आणि तसेच पुढे निघाले.....

सकाळी उठलो तर आई मला बाबांनी रात्री नेलं म्हणून बाबाना बोलत होती. तिला फार चिंता वाटत होती.तेव्हा काही वाटलं नाही. पण आज कधी कधी विचार येतो की एवढं लहान असताना मला बाबांनी हे सगळ दाखवण्यासाठी का नेलं असावं?
लहान मूलांना बर्‍याच वेळा स्मशानात वैगरे येऊन देत नाहीत. मी मात्र वयाच्या 10 वर्षांपासून अंतयात्रेसाठी जात आलोय.....बाबाच न्यायचे... यातून या सर्व गोष्टींची भीती मात्र मनातून नाहीशी झाली...

अश्रफ भाई मात्र आमचे उपकार कधीच विसरले नाहीत... अजूनही ते कुटुंब आमच्या संपर्कात आहे...2 वर्षांपूर्वी माझी काकी खूप आजारी होती... 5 महिने मुंबई ला हॉस्पिटल ला होती... जेव्हा हे अश्रफ भाईना कळलं तेव्हा ते स्वत: होली स्पिरिट ला येऊन काकी ची चौकशी करायचे... आणि रोज डब्बा सुद्धा त्यांच्या घरून यायचा...

मी साधारण पाचवीत - सहावीत असताना एकदा मारुती गायब झाला... तसा तो मध्येच कधीतरी घरी येणं बंद करायचा.. पण यावेळी तो 10-12 दिवस कोणालाच दिसलाच नाही...
आम्ही शोध सुरू केला.. पाड्यावरही नव्हता...
पोलिसांना कळवलं... ....
काही दिवसांनी बोर्डी पोलिसांकडून फोन आला.... त्यांना एक प्रेत घोलवड रस्त्यावर सापडलं होतं 10 दिवसांपूर्वी...
आम्ही बोर्डी ला पोचलो...मारुतीचाच फोटो होता...... मनात धस्स झालं...
"प्रेत कुठे आहे?" बाबांनी इनस्पेक्टरला विचारलं

"साहेब 6 दिवस कोणी आलं नाही... परवाच बेवारस म्हणून नोंद झाली .. डहाणू च्या किनारयावर गाडलं बघा......!!"
बाबा निशःब्द बसून राहिले.... तसेच... बराच वेळ....

Thursday, September 6, 2007

गॅब्रु

लहानपणी प्रत्येक गोष्टीची सुरूवात "आट्पाट नगर होत" ने व्हायची तशीच या गोष्टीची सुरूवात ही होणार आहे.
मुंबई जवळ एक छोटस शहर आहे डहाणू म्हणून! बहुतेक सर्व गोष्टी इथल्याच आहेत. याच सुंदर गावात मझ पूर्ण बालपण गेल. मुंबई च्या एवढ्या जवळ असूनही बर्‍यापैकी गाव राहिलेली जागा आहे डहाणू म्हणजे! गावाला छानसा समुद्रकिनारा आहे. मोठी सुरुची बाग आहे. किनारया जवळच्या शाळेतच मी माझ शिक्षण पूर्ण केल. रेलवे स्टेशन जवळच्या एका चाळीत आम्ही सगळे राहायचो. ही वस्ती तशी बरीच गजबजलेली. अठारपगड जातीचे लोक इथे राहायचे. पण चाळ तशी लहान होती. 3-4 कुटुंब राहायची फक्त.

सकाळी आईची घाई सुरू असायची बाबांच्या आणि आमच्या डब्ब्यामुळे. एवढ्यात मागच्या दारुन आवाज यायचा
"वहिनी काही आणायचाय का बाजारातून?". हा आवाज तसा एकदम ओळखीचा.
आई आतुनच नाही अस सांगायची. कारण हो संगितल तरी वस्तू बाजारातून कधी घरात येईल याचा नेम नसायचा.
बाहेर गेल तर दारुचा उग्र दर्प नाकात घुसायचा.
आई कधीकधी बोलून जायची.. "काय हे गॅब्रीएल सकाळि असा पिऊन येतोस. घरी बायको आहे 2 मुल आहेत. तुला काही काळजी आहे की नाही?" त्याच ठरलेलं उत्तर असायच "वहीनी शंकर बाबा पाहून घेईल सगळ."

नाव गॅब्रीएल पण शंकराचा निस्सीम भक्त होता. चर्च मध्ये सुद्धा जायचा. उत्तम मेकॅनिक होता पण काम कधीच सोडून दिल होत. बायको एका हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून कामाला होती त्यावरच घर चालायच.
पण या माणसाकडे एक अजब कला होती. अजूनही त्याने दाखवलेले त्या कलेचे अनेक चमत्कार डोळ्यापुढून हलत नाहीत.गावात कुठेही साप निघाला की सगळ्याना ह्याची आठवण व्हायची.मग एखाद दोघे त्याला शोधायला निघायचे. हा कुठेतरी दारू पिऊन पडलेला असायचा त्याला पकडून आणायचे. साप म्हटल्यावर हाही तयार व्हायचा. सापांवर विलक्षण प्रेम. शंकराचा आशीर्वाद आहे म्हणायचा.
साप कुणाच्यातरी घरात किंवा वाड्यात शिरलेला असायचा. आमच्याकडे वाडा म्हणजे पुण्यातला वाडा नाही... वाडा म्हणजे घराशेजारची छोटीशी बाग किंवा राई.घरातले सगळे टेन्षन मध्ये असायचे. पण गॅब्रीएल आल्यावर सगळे सुटकेचा निश्वास सोडायचे.
हा आल्याआल्या घरातल्या बाईकडून तांदूळ मागून घ्यायचा. त्या तांदळाच एक व्यवस्थित वर्तुळ काढायचा. आणि मग जमिनीवर आडवा पडून काहीतरी मंत्र गुण गुणायला सुरूवात करायचा. हाताच्या बोटांनी जमिनीवर बराच वेळ ट्ट्क ट्ट्क सुरू असायच. पाहायला ही गर्दी जमायची. आणि थोड्याच वेळात कुठुनतरि लपलेला तो साप बाहेर येऊन स्वत:हून त्या वर्तुळात येऊन वटोळे घालून बसायचा. हा अलगद त्याला पकडायचा आणि मग सुरू व्हायचा खरा खेळ. गॅब्रीएल ची धुंदी आता बर्‍यापैकी उतरलेली असायची.
त्याला लगेच कळायाचं कळायचं या जमलेल्या लोकांसाठी आता पृथ्वी वर माझ्यापेक्षा महत्वाचा माणूस कोणीच नाही. हा हातात साप नाचवत प्रत्येका समोर जायचा आणि पैसे मागायचा. पैसे मिळाले की त्याच रात्री हा त्या सापला जंगलात सोडून द्यायचा.
एकदा आमच्या वाड्यात साप निघाला. नेहमीप्रमाणे गॅब्रीएल ला बोलवण पाठवल.. याने साधारण अर्ध्या तासात साप पकडला.. छोटासा नाग होता.
सगळ्यानी पैसे दिले पण आमच्या समोरचा टेलर काही पैसे द्यायला तयार नव्हता. त्याचंही बरोबर होतं .. साप पकडला दुसर्‍याच्या वाड्यात तर आम्ही कशाला पैसे द्यायचे.
हाही तेवढाच हुशार. "**** आज ही तेरे घर में छोड़ता हुं रूक साल्ले!!!" टेलर घाबरला. 20 ची नोट काढून त्याच्या हातात ठेवली. गर्दी जास्त वाढली तर याला जास्त जोर यायचा. मग एका हातात साप घेऊन सर्वंसमोर ओरडायचा. "देखो देखो महादेव का प्रसाद लेटा हु!!" अस म्हणून सापाचे दात हातावर घ्यायचा. साप कडकडून चवायचा. हा पटकन त्यावर कसली तरी पूड टाकायचा आणि नाचायला लागायचा. आमच्या डोळ्यासमोर त्याने हा प्रकार बर्‍याच वेळा केला.. आम्हालाही आश्चार्य वाटायच की हा जिवंत कसा राहतो.
एकदा याची बायको घाबरली ज्या हॉस्पिटल मध्ये काम करत होती तिथल्या डॉक्टर कडे घेऊन गेली.
डॉक्टरांनी विचारलं "कुठला साप होता... पहिलास का..?"
याने लगेच खिशात हात घातला आणि तो सापाच डॉक्टोरांच्या टेबल वर ठेवला... डॉक्टर बोम्बा मारत बाहेर पळाले.

एकदा नेहमीप्रमाणे घरी आला. आई म्हणाली अरे एवढा दारू पिशील तर मारशील ना रे बाळा.
हा लगेच म्हणाला.. "नाहीतरी या शिवरात्रीच्या दिवशी मरणारच आहे वैनी. आणि मरेन तर दारुमूळे मरणार नाही , साप चावून मरेन". नेहमीसारख आम्ही हसलो आणि दुर्लक्ष केल.

पण साधारण महिन्याभरानेच भयंकर अनुभव आला. आमच्या नगरसेवकाच्या घरात साप शिरला होता. गॅब्रीएल गेला. त्याने साप पकडला पण पोत्यात ठेवताना साप त्याच्या मनगटाला चावला. साप ही असा विषारी होता की विष अंगात भिनायला फक्त काही सेकंद लागले याने हात खिशात घातला. पण रिकामाच बाहेर पडला. पूड खिशात नव्हती. हा हसला. माझा काका बाजूलाच उभा होता. सगळ्याना काहीच जाणवले नाही, कारण हे तर नेहमीचेच होते. पण काहीच मिनिटांनी कळल की हा मामला नेहमीचा नाहीए. गॅब्रीएल ने एकदम हात जोडले, मंद हसला आणि तेथेच कोसळला.

मी पुण्याला होतो. रात्री आईचा फोन आला तिने ही बातमी सांगितली. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. रात्री मित्रांबरोबर मेस वर गेलो. पाहील तर काकूनी फक्त साबूदाण्याची खिचडी केली होती.
विचारल "काकू आज काय स्पेशल ?"
आतून आवाज आला... "आज महाशिवरात्र आहे ना रे!! "