लहानपणी प्रत्येक गोष्टीची सुरूवात "आट्पाट नगर होत" ने व्हायची तशीच या गोष्टीची सुरूवात ही होणार आहे.
मुंबई जवळ एक छोटस शहर आहे डहाणू म्हणून! बहुतेक सर्व गोष्टी इथल्याच आहेत. याच सुंदर गावात मझ पूर्ण बालपण गेल. मुंबई च्या एवढ्या जवळ असूनही बर्यापैकी गाव राहिलेली जागा आहे डहाणू म्हणजे! गावाला छानसा समुद्रकिनारा आहे. मोठी सुरुची बाग आहे. किनारया जवळच्या शाळेतच मी माझ शिक्षण पूर्ण केल. रेलवे स्टेशन जवळच्या एका चाळीत आम्ही सगळे राहायचो. ही वस्ती तशी बरीच गजबजलेली. अठारपगड जातीचे लोक इथे राहायचे. पण चाळ तशी लहान होती. 3-4 कुटुंब राहायची फक्त.
सकाळी आईची घाई सुरू असायची बाबांच्या आणि आमच्या डब्ब्यामुळे. एवढ्यात मागच्या दारुन आवाज यायचा
"वहिनी काही आणायचाय का बाजारातून?". हा आवाज तसा एकदम ओळखीचा.
आई आतुनच नाही अस सांगायची. कारण हो संगितल तरी वस्तू बाजारातून कधी घरात येईल याचा नेम नसायचा.
बाहेर गेल तर दारुचा उग्र दर्प नाकात घुसायचा.
आई कधीकधी बोलून जायची.. "काय हे गॅब्रीएल सकाळि असा पिऊन येतोस. घरी बायको आहे 2 मुल आहेत. तुला काही काळजी आहे की नाही?" त्याच ठरलेलं उत्तर असायच "वहीनी शंकर बाबा पाहून घेईल सगळ."
नाव गॅब्रीएल पण शंकराचा निस्सीम भक्त होता. चर्च मध्ये सुद्धा जायचा. उत्तम मेकॅनिक होता पण काम कधीच सोडून दिल होत. बायको एका हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून कामाला होती त्यावरच घर चालायच.
पण या माणसाकडे एक अजब कला होती. अजूनही त्याने दाखवलेले त्या कलेचे अनेक चमत्कार डोळ्यापुढून हलत नाहीत.गावात कुठेही साप निघाला की सगळ्याना ह्याची आठवण व्हायची.मग एखाद दोघे त्याला शोधायला निघायचे. हा कुठेतरी दारू पिऊन पडलेला असायचा त्याला पकडून आणायचे. साप म्हटल्यावर हाही तयार व्हायचा. सापांवर विलक्षण प्रेम. शंकराचा आशीर्वाद आहे म्हणायचा.
साप कुणाच्यातरी घरात किंवा वाड्यात शिरलेला असायचा. आमच्याकडे वाडा म्हणजे पुण्यातला वाडा नाही... वाडा म्हणजे घराशेजारची छोटीशी बाग किंवा राई.घरातले सगळे टेन्षन मध्ये असायचे. पण गॅब्रीएल आल्यावर सगळे सुटकेचा निश्वास सोडायचे.
हा आल्याआल्या घरातल्या बाईकडून तांदूळ मागून घ्यायचा. त्या तांदळाच एक व्यवस्थित वर्तुळ काढायचा. आणि मग जमिनीवर आडवा पडून काहीतरी मंत्र गुण गुणायला सुरूवात करायचा. हाताच्या बोटांनी जमिनीवर बराच वेळ ट्ट्क ट्ट्क सुरू असायच. पाहायला ही गर्दी जमायची. आणि थोड्याच वेळात कुठुनतरि लपलेला तो साप बाहेर येऊन स्वत:हून त्या वर्तुळात येऊन वटोळे घालून बसायचा. हा अलगद त्याला पकडायचा आणि मग सुरू व्हायचा खरा खेळ. गॅब्रीएल ची धुंदी आता बर्यापैकी उतरलेली असायची.
त्याला लगेच कळायाचं कळायचं या जमलेल्या लोकांसाठी आता पृथ्वी वर माझ्यापेक्षा महत्वाचा माणूस कोणीच नाही. हा हातात साप नाचवत प्रत्येका समोर जायचा आणि पैसे मागायचा. पैसे मिळाले की त्याच रात्री हा त्या सापला जंगलात सोडून द्यायचा.
एकदा आमच्या वाड्यात साप निघाला. नेहमीप्रमाणे गॅब्रीएल ला बोलवण पाठवल.. याने साधारण अर्ध्या तासात साप पकडला.. छोटासा नाग होता.
सगळ्यानी पैसे दिले पण आमच्या समोरचा टेलर काही पैसे द्यायला तयार नव्हता. त्याचंही बरोबर होतं .. साप पकडला दुसर्याच्या वाड्यात तर आम्ही कशाला पैसे द्यायचे.
हाही तेवढाच हुशार. "**** आज ही तेरे घर में छोड़ता हुं रूक साल्ले!!!" टेलर घाबरला. 20 ची नोट काढून त्याच्या हातात ठेवली. गर्दी जास्त वाढली तर याला जास्त जोर यायचा. मग एका हातात साप घेऊन सर्वंसमोर ओरडायचा. "देखो देखो महादेव का प्रसाद लेटा हु!!" अस म्हणून सापाचे दात हातावर घ्यायचा. साप कडकडून चवायचा. हा पटकन त्यावर कसली तरी पूड टाकायचा आणि नाचायला लागायचा. आमच्या डोळ्यासमोर त्याने हा प्रकार बर्याच वेळा केला.. आम्हालाही आश्चार्य वाटायच की हा जिवंत कसा राहतो.
एकदा याची बायको घाबरली ज्या हॉस्पिटल मध्ये काम करत होती तिथल्या डॉक्टर कडे घेऊन गेली.
डॉक्टरांनी विचारलं "कुठला साप होता... पहिलास का..?"
याने लगेच खिशात हात घातला आणि तो सापाच डॉक्टोरांच्या टेबल वर ठेवला... डॉक्टर बोम्बा मारत बाहेर पळाले.
एकदा नेहमीप्रमाणे घरी आला. आई म्हणाली अरे एवढा दारू पिशील तर मारशील ना रे बाळा.
हा लगेच म्हणाला.. "नाहीतरी या शिवरात्रीच्या दिवशी मरणारच आहे वैनी. आणि मरेन तर दारुमूळे मरणार नाही , साप चावून मरेन". नेहमीसारख आम्ही हसलो आणि दुर्लक्ष केल.
पण साधारण महिन्याभरानेच भयंकर अनुभव आला. आमच्या नगरसेवकाच्या घरात साप शिरला होता. गॅब्रीएल गेला. त्याने साप पकडला पण पोत्यात ठेवताना साप त्याच्या मनगटाला चावला. साप ही असा विषारी होता की विष अंगात भिनायला फक्त काही सेकंद लागले याने हात खिशात घातला. पण रिकामाच बाहेर पडला. पूड खिशात नव्हती. हा हसला. माझा काका बाजूलाच उभा होता. सगळ्याना काहीच जाणवले नाही, कारण हे तर नेहमीचेच होते. पण काहीच मिनिटांनी कळल की हा मामला नेहमीचा नाहीए. गॅब्रीएल ने एकदम हात जोडले, मंद हसला आणि तेथेच कोसळला.
मी पुण्याला होतो. रात्री आईचा फोन आला तिने ही बातमी सांगितली. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. रात्री मित्रांबरोबर मेस वर गेलो. पाहील तर काकूनी फक्त साबूदाण्याची खिचडी केली होती.
विचारल "काकू आज काय स्पेशल ?"
आतून आवाज आला... "आज महाशिवरात्र आहे ना रे!! "
Thursday, September 6, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment