Friday, September 7, 2007

मारुती

रात्री दीड दोन वाजता दारावर थाप पडली. आम्ही दचकून उठलो.
बाहेरून कुणीतरी "दिलीप भाय !! ओ दिलीप भाय अशी हाक मारत होत. बाबा उठले..."कोण आहे??" ओरडले.आवाज तसा ओळखीचा होता.
दरवाजा उघडला. रेलवे स्टाँल वरचा शिरीभैय्या कोणाला तरी घेऊन आला होता. 2-3 माणसे होती. डोक्यावर मुस्लिम टोप्या होत्या. पांढरा शुभ्र झब्बा-लेंगा घातला होता.

"क्या हुआ?" बाबा.
"ये कुछ लोग आए थे.. आपका पता पुछ रहे थे? बहोत अर्जेंट काम है बोल रहे है! आपको ही बतायेंगे !"
एकदम एक जण पुढे झाला....नमस्कार करून बोलला.. "आठ दिन से औरत को ढूंढ़ रहा हू.. मुबई से अजमेर जा रहे
थे!! रात का सफर था.. सुरत पहुँचे तो देखा की वो जगह पर नही है... गाडी में देखा... नही मिली..
आठ दिनोमें सुरत से मुंबई तक हर स्टेशन पर एंक्वाइरी कि, कोई पता नही. आज दहानू पोलीस स्टेशन से फोन आया था. एक औरत की लाश मिली थीं चार दिन पहले.. दहानू स्टेशन के पास....उन्होने फोटो दिखाया.."

एवढं बोलला आणि एकदम रडायला लागला. बाजूचे दोघे ही धाय मोकलुन रडायला लागले. आम्हाला काही सुचेचना..
बाबांनी त्याला धीर दिला.
"फिर?? पोलीस क्या बोल रहे है?"
"लाश समुन्दर किनारे दफ़ना दि है बोले..."
पुर्वी डहाणू सारख्या ठिकाणी प्रेत ठेवण्यासाठी काही सोय नसल्यामुळे... बेवारस प्रेतांना 3-4 दिवसांनतर समुद्रकिनारी दफन करायचे.
तिघे जण खुप रडत होते....आईने चहा केला.... बाबांनी ओळखले की काय कामासाठी आलेत हे लोक...
वर्षातून एकदातरी असं कोणीतरी यायचं.. मला काहीच कळायच नाही की हे लोक कोण येतात आणि अचानक बाबा वैगरे मारुती ला शोधायला पाड्यावर का जातात... पाडा म्हणजे 15-20 घरांची आदिवासींची वस्ती.
आणि आता या गोष्टीचा नायक....मारुति...

लहानपणापासून हा माणूस आमच्याकडे का येतो.. आजोबा याला का पैसे देतात आणि हा दिवसभर आमच्या घराची काहीतरी साफसफाई करत का राहतो हे आम्हाला कधीच कळलं नाही... अजुनही माहित नाहि.
परत हा चोवीस तास दारूच्या नशेत....आम्ही त्याच रूप पाहून थोडसं घाबरायचोच त्याला..
दाढी वैगरे वाढलेली असायची... बर्‍याच वेळा अंगावर कपडे नसायचे.. आजोबांचाच फाटका पंचा हा नेसायचा.. वयाने आजोबांहून दुप्पट म्हातारा दिसायचा.. भूतांच्या गोष्टीतला म्हातारा असतो ना अगदी तसाच.
दिवसभर काहीतरी बडबड सुरू असायची.... दुपारी जेवायचा मग घरच्या मांडवातच झोपायचा.
आम्ही जवळ आलो कि वारली भाषेत काहीतरी शिव्या द्यायचा... पण आम्ही कधी फार जवळ जायचा प्रयत्नच नाही केला...
संध्याकाळी पाड्यावर निघून जायचा... बहुतेक एकटाच राहायचा....पण काहीतरी खास होतं त्याच्यात एवढं नक्की..

आज ही बाबा आलेल्या त्या सगळ्यांना घेऊन काकाच्या घरी जायला निघाले.. घरात तेव्हा जीप होती. काकाचे घर जवळच होते. आलेले लोक मुंबई चे होते. त्यांच्याकडे त्यांची गाडी होती. पण त्यादिवशी बाबाना काय झालं काय माहीत त्यानी मला पण बरोबर घेतल...
आम्ही काका बरोबर पाड्यावर गेलो...मारुती च्या घरी....
म्हणायला फक्त घर होतं...8 बाय 8 च्या कुडाच्या भिंती होत्या फक्त.... म्हातारा घराबाहेरच झोपला होता... बाबांनी एका हाकेत उठवलं....
चेहरयावर कुठलेही भाव नव्हते...."मारुती चल निघायाचयं.... " बाबा.
हा शांतपणे उठला... गाडीत येऊन मागे बसला.... दारूचा वास पुर्ण गाडीत पसरला .... मी नाक बंद केलं
"दादा नवासूया भेटाया लागल..." मारुती.
काका ने जोरात शिवी घातली. " ******* संध्याकाळी झाली तेवढी पुरी नाही का??"
"तुला मायतेय ना दादा.. पोटात गेल्या बिगीर् नाही वास लागत्..."
आम्ही नवसू च्या घराकडे जीप वळवली. नवसू म्हणजे चिकू च्या दारूचा धंदा करणारा पाड्यावरचा पोरगा......
त्याला उठवला...2 बाटल्या बरोबर घेतल्या.... काकाने शिवी देऊन एक म्हातरयाच्या हाती दिली... त्याने क्षणाचाही विलंब न करता तोंड लावलं....मागच्या गाडितले लोक बिचारे ह्ताशपणे सगळं पाहत होते...

मारुती बरोबर पाड्यावरची आणखीन 2 माणसं पण आम्ही जीप मध्ये घेतली..दोन्ही गाड्या सुरू झाल्या... आणि थेट समुद्रकिनारयावर पोचल्यावारच थांबल्या...हा झिंगत झिंगत गाडीतून उतरला....
"वस्तू आणलयं व्हय....??" याने काकाला विचारले
"भाभी का कुछ चीज लाये हो साथ में??" काकाने त्यातल्या वयाने सगळ्यात मोठ्या दिसणार्‍या माणसाकडे बघून विचारले.
याचे नाव अश्रफ भाई होते...आणि बाकीचे दोघे म्हणजे त्याची मुलं होती...
त्याने गाडीतुन एक साडी काढून काकाकडे दिली.... त्याने मारुतीच्या हातावर ठेवली...म्हातारयाने बाटली एका घोटात अर्धी केली...साडीचा नाकाजवळ नेउन जोरात वास घेतला..... आणि झिंगत झिंगत सुरुच्या

बागेतुन किनारयाजवळ जायला सुरूवात केली... आम्ही सगळेही मागोमाग पाळायला लागलो....
हा मध्येच पळायचा...मध्येच थोडावेळ थांबायचा...कधीतरी स्वातःभोवतीच एक चक्कर मारायचा....
एका ठिकाणी मात्र खूप वेळ थांबला.. बाबांकडे मान फिरवली आणि ओरडला "यथंच आहे दादा !"
काका आणि बाकिचे दोघे पुढे झाले ... बाबा मला, अश्रफ भाई आणि त्याच्या मूलांना घेऊन मागे राहिले .... ते तिघे पुढे जात होते ...पण बाबांनी थांबा म्हटलं...
कुदळ आणि फवडा बरोबर होताच..... मारुती मात्र तेथेच आडवा झाला. ... त्याच्यात आता बोलण्याचीही ताकत उरली नव्हती...प्रचंड थकवा आला होता.
बाकी दोघे त्याने दाखवलेल्या ठिकाणी जमीन खोदायला लागले...... थोड्याच वेळात एकदम दुर्गंधी आली... मी पट्कन नाकाला हात लावला. बाबांनी माझ्याकडे डोळे मोठं करून पाहिलं... नाकाचा हात

काढला.....
दोघं आदिवासी आणि काका खड्ड्यात उतरले. तिघांनी मिळून एकदम प्रेत उकरुन काढल. अश्रफ भाई आणि त्यांची मुलं जागीच कोसळली. त्यापैकी एकाचा तर शब्दच फुटेना तोंडातून... बाबांनी सावरलं त्यांना. त्यांनी आणलेली साडी प्रेताच्या अंगावर टाकली.

थोडावेळ सगळेच शांत बसून राहीले... फक्त लाटांचा आवाज येत होता.

"30 साल हुए हमारे शादी को परसो.. उसके लिये अजमेर जा रहे थे" असं म्हणून अश्रफ भाई राडायला लागले...एक मुलगा सावरला होता. त्याने त्यांना घट्ट मिठी मारली...

ते दृश्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही.
"अँब्युलेन्स मिलेगी मुबई जानेको?" त्यांच्या मुलाने विचारलं.
"आता बाँडी घेऊन जाणं शक्य नाही कुठे.... रात्रीच इथे अंतिम संस्कार करावे लागतील! " बाबा म्हणाले.
तिघांना समजावून सांगितलं.
काकाने पोलीस इनस्पेक्टर ला फोन लावला. त्यांना प्रेत मिळाल्याची आणि आम्ही सकाळच्या आत विधी उरकणार आहोत अशी कल्पना दिली.
मला घेऊन बाबा घरी आले. काकाही पहाटे या तिघांबरोबर घरी आला. मारुती अजूनही जीप मध्ये झोपुन
होता... बाकी दोघांनी त्याला उतरवलं...
आईने सगळ्यांना चहा दिला.... मी जागा नाव्हतो... पहिल्यांदाच रात्री जागरण झालं होतं.....
ते तिघे काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. अश्रफ भाई नी खिशात हात घातला. 100 च्या नोटांच एक बण्डल काढलं बाहेर....
बाबा हसले ... मानेनचं नाही म्हणाले...
"उसके लिये तो रख लेना..." मारुति कड़े बोट दाखावुन अश्रफभाई म्हणाले.
"उसको पैसेसे कुछ लेना देना नही है... उसका खुदाही मालिक है..." काका म्हणाला..
अश्रफ भाई पुढे झाले... त्या 2 आदिवासींच्या हातावर 500 रुपयांच्या 2 नोटा टेकवल्या आणि तसेच पुढे निघाले.....

सकाळी उठलो तर आई मला बाबांनी रात्री नेलं म्हणून बाबाना बोलत होती. तिला फार चिंता वाटत होती.तेव्हा काही वाटलं नाही. पण आज कधी कधी विचार येतो की एवढं लहान असताना मला बाबांनी हे सगळ दाखवण्यासाठी का नेलं असावं?
लहान मूलांना बर्‍याच वेळा स्मशानात वैगरे येऊन देत नाहीत. मी मात्र वयाच्या 10 वर्षांपासून अंतयात्रेसाठी जात आलोय.....बाबाच न्यायचे... यातून या सर्व गोष्टींची भीती मात्र मनातून नाहीशी झाली...

अश्रफ भाई मात्र आमचे उपकार कधीच विसरले नाहीत... अजूनही ते कुटुंब आमच्या संपर्कात आहे...2 वर्षांपूर्वी माझी काकी खूप आजारी होती... 5 महिने मुंबई ला हॉस्पिटल ला होती... जेव्हा हे अश्रफ भाईना कळलं तेव्हा ते स्वत: होली स्पिरिट ला येऊन काकी ची चौकशी करायचे... आणि रोज डब्बा सुद्धा त्यांच्या घरून यायचा...

मी साधारण पाचवीत - सहावीत असताना एकदा मारुती गायब झाला... तसा तो मध्येच कधीतरी घरी येणं बंद करायचा.. पण यावेळी तो 10-12 दिवस कोणालाच दिसलाच नाही...
आम्ही शोध सुरू केला.. पाड्यावरही नव्हता...
पोलिसांना कळवलं... ....
काही दिवसांनी बोर्डी पोलिसांकडून फोन आला.... त्यांना एक प्रेत घोलवड रस्त्यावर सापडलं होतं 10 दिवसांपूर्वी...
आम्ही बोर्डी ला पोचलो...मारुतीचाच फोटो होता...... मनात धस्स झालं...
"प्रेत कुठे आहे?" बाबांनी इनस्पेक्टरला विचारलं

"साहेब 6 दिवस कोणी आलं नाही... परवाच बेवारस म्हणून नोंद झाली .. डहाणू च्या किनारयावर गाडलं बघा......!!"
बाबा निशःब्द बसून राहिले.... तसेच... बराच वेळ....

No comments: